Pages

Saturday, February 12, 2011

ते


कधीकधी येतात 'ते' अगदी नटून-थटून. ठेवणीतले कपडे घालून. दागिने वगैरे पण एकदम चकचकीत. makeup आणि  touch-ups मध्ये भरपूर वेळ घालूनच येतात. सणासाठी तयार झाल्यासारखे. आवडून जातात मग, अगदी बघत रहावसं वाटतं त्यांच्याकडे. नखशिखांत almost perfect, flawless.

-कोण रे 'ते' ?
--अर्रे तेच ना... आपले हे रे..काय म्हणतात त्यांना?.. डोळ्यासमोर आहेत राव ते... ऐनवेळी बरोबर आठवत नाहीत बघ  ..

किंवा कधीकधी 'ते' झोपेतून उठून, चीपाडलेले डोळे चोळत समोर उभे राहतात... विस्कटलेल्या,सुटत आलेल्या night dress मध्ये..अर्धवट झोपेत असतात.. सुजलेले झोपाळू डोळे, उशीच्या लालसर खुणा उमटलेले टम्म गाल, हळूहळू-रडकी चाल.. मग येऊन बिलगतात.. तोंडाचा वास येत असतोच... पण तरी उचलून घ्यावसं वाटतं त्यांना, टम्म गालाला अजून लाल करणारा एक मोठा मुका घेऊन कडेवर घ्यायचं त्यांना.... मान खांद्यावर टाकून परत झोपी जातात किंवा नुसते चिकटून बसतात आपल्याला.. अगदी कसलाही आव न आणता आलेले असतात 'ते', innocent, raw, सच्चे ... 

-चिल्लीपिल्ली पोरं का ?
--नाहीरे.. थांब सांगतो.. आवडतात  मला ते तसे चिल्ल्यापिल्ल्या बाळासारखे चिकटलेले.. 

किंवा ...तू जादुगाराची  कळशी बघितलीयेस का? सगळं पाणी ओतून देतो तो..असं वाटतं सगळं पाणी संपलंय आता..पण मग थोड्या वेळाने तो परत कळशी उलटी करतो...परत त्यातून पाणी पडतं..असा कितीही वेळा करा..थोड्याथोड्या वेळाने थोडे थोडे पाणी त्यातून पडत राहत...किंवा तुला diabetes आहे का? दिवसातून हजारवेळा जावं लागतं....दरवेळी थोडी का होईना होतीच..पण पूर्ण नाहीच.अगदी छटाक -छटाक दरवेळी.. तसे येतात ते.. हळूहळू, थांबून थांबून.... धड संपत पण नाही आणि धड सलगपणे एकाच वेळी येतही नाहीत.. इतके नाही आवडत ते मला अशावेळी.. एक चांगलं असतं कि संपत नाही कधीच ..Daily Soaps सारखे... पण मग मजा नाही राव त्यात.... तितका patience लागतो मग त्यांना पूर्ण पाहायला...  इतका वेळ घेऊन येतात पण चांगले असतात एकदा आले कि..

-मला नाहीये diabetes अजिबात. उगाच काही करून अश्या  घाणेरड्या उपमा कशाला देत असतोस? सांग ना पटकन काय आहे ते...
--घाणेरड्या उपमा काय? चायला जगातल्या ३७.६७% लोकांना diabetes आहे...त्यांना कळेल कि हे लगेच... आणि  बाकी लोकांसाठी जादूगाराच्या कळशीची  उपमा आहे ना.. थांब ..अजून एक वाईट उपमा देतो...... 

constipation झाल्यासारखे! नाहीच येत 'ते' कधी कधी... कितीही वेळ वाट पहा, pressure येण्यासाठी वर्तमानपत्र  वाचा, cigg ओढा.. नाहीच येत ते...मग वेड्यासारखी मिन्नात -वारी करत बसायची.. कधी एकदा ते येतात असं झालेलं असतं.. खूप साचून-साचून असतं आत सगळं... मोकळं व्हायचं असतं.. आणि नेमके त्यावेळी ते येत नाही... अस्वस्थ वाटत असतं खूप पण तरी ते आपली पर्वा न करता, त्यांच्याच मर्जीने येतात..
पण एकदा ते आले कि मग खूप मस्त वाटत असतं..मोकळं-मोकळं, हलकं-हलकं... अशावेळी ते जेव्हा येतात ते खूप भारी होऊन येतात... इतकी वाट पाहण्याचं सार्थक झाल्यासारखं असतं ते.. 

- आवर रे..सांग बाबा पटकन... इतकं pressure देण्यासारखं  नाहीये हे.... 'ते ' कोण आहेत ते सांग.. तुझे कमरेखालचे जोक्स नाईलाजाने ऐकत बसण्याइतकं नाहीयेत 'ते' महत्वाचे ..सांग लवकर, नाहीतर जातो मी 
--'ते' महत्वाचे नाहीयेत ?

असे ढगफुटी सारखे येतात कधीकधी 'ते'..  अचानक, तयार नसतो आपण अजिबात...धो-धो बरसतात ते... काही कळायच्या आत आपण चिंब भिजलेलो असतो... 'ते कसे आले', 'कसे गेले' हे कळण्या आधीच तो क्षण ओसरलेला असतो... केवळ ते येऊन गेले इतकंच कळत असतं...ढगफुटीचा तो moment नाहीच परत जसाच्या तसा मांडता येत... नंतर चिबं अंगाला जाणवणारे शहारे तेव्हडे राहतात... केवळ ते शहारे हीच ते आल्याची आल्याची खुण, पुरावा... ते आल्याचे exact moments, त्यांचं त्यावेळचं नेमकं रुपडं नाहीच सापडत परत.. जसंच्यातसं नाहीच सांगता येत - ते कसे आले होते?, ते कसे होते?.
पण त्यांचं येणं हे फक्त अनुभवणं  असतं.. नाहीच  सांगता येत काय वाटतं त्यावेळी.. सर्वात भारी असतात 'ते' त्यावेळी.. 

-निघालो मी.. इतकी पानं खाऊन पण नाही सांगता आलं तुला कोण आहेत 'ते'...किती लायनी खर्च केल्यास? बघ जरा - पंधराशे लायनी, सतराशे साठ शब्द....
-- "शब्द"...अगदी बरोबर.. आता आठवला तो शब्द............अर्रे "ते" म्हणजे "शब्द"..