Pages

Thursday, April 28, 2011

फ्लायओवर


कितीतरी महिने रेंगाळत राहिलेला तो फ्लायओवर. काहीतरी झालं आणि बंद पडलं काम. नुसता सांगाडा बांधून झालाय.
रस्त्यापासून पन्नासेक फूट उंचावर. त्याच्या सिमेंटच्या जाडजूड पिलर्सच्या जोडीला मांडवासारखे लोखंडी खांब आहेत फक्त. 
दोन उभ्या पिलर्सना जोडणारे आडवे दोन पिलर्स. मध्ये रस्ता नाहीचे, मोठ्या मोठ्या पिलर्सचे टप्पे आणि मध्ये सिमेंटच्या आडव्या पिलर्सच्या मोकळ्या चौकटी. 
अपूर्ण फ्लायओवरचा अजस्त्र सांगाडा....

.. रात्रीची वेळ... रस्त्यावरच्या दिव्यांचा पिवळा-भगवा रणरणता प्रकाश आहे... वर्दळ नाहीये अजिबात... सगळंच शांत.......
एका पिलरवर तो बसलाय.. जाडजूड मोठा पिलर, आजूबाजूला पसरलेला फ्लायओव्हरचा अवाढव्य सांगाडा  आणि त्याच्या एका टोकाला हा एकटा...
मधूनच हा दोन पिलर्सना जोडणाऱ्या आडव्या पिलरवरून इकडे-तिकडे फिरतोय. या पिलरवरून त्या पिलरवर. आणि परत दुसऱ्या पिलरच्या टोकाला येऊन बसतो.. 
पिलरपुढे तो मोठ्या खांबावर मारलेल्या खिळ्यासारखा वाटतोय- खुजा, पण पिलरसारखाच भाग झाल्यासारखा  ...
त्याच्या हातात एक जुनाट वही आहे, जीर्ण पानांच्या चिंध्या झालेली, लिहायला जागाच न उरलेली, लिहिलेलं पण अर्ध-अधिक पुसट झालंय आता.
एकदम लहान, टोक बोथट झालेली, संपत आलेली शिसपेन्सिल..
बसून काहीतरी खरडतो आहे तो. मधुनच स्वतःशीच बोलतोय....

"फ्लायओव्हर....... थांबलाय हा पण. याला पण धावायचं होतं. त्रेपन्न फुटांवरून उडी घेत होता साला...चौपदरी झाला असता पूर्ण झाला असता तर..
यावेळी पण भन्नाट वेगात गाड्या गेल्या असत्या याच्या अंगावरून. या प्रकाशात स्वताला मिरवत बसला असता ..
पण...आता नुसता हाडाचा सांगाडा होऊन बसलाय हा, एकटा .. 
तसा एकटा नाही - अजून एक हाडाचा सांगाडा याच्या वर फेऱ्या मारतोय कि आता... 
पण केवळ कोणीतरी बरोबर 'दिसतंय' याला 'सोबत' नाही म्हणता येणार. असे 'दिसायला' कितीतरी लोकं होते कि आपल्यापण बरोबर.  शेवटी किती जणांनी 'सोबत' केली? 
शेवटी आपल्याच हाडांनी स्वतःलाच आधार द्यायचा असतो. 
आता या सांगाड्याच्याच आड लपून राहतोय न मी ? एका सांगाड्याच्या आधाराने दुसरा...तसंही या दोन्ही सांगाड्यात काय फरक उरलाय आता? 
पण बरंय एका अर्थाने.. हा असा थांबून राहिलाय..नाहीतर मला कोणी जागा दिली असती ? अशी ? इतकी ?... 
लोकांपासून इतकी वर..तरीहि लोकांच्या नकळत त्यांना पाहत राहण्याइतकी त्यांच्या जवळहि.."

"दिवसभर झोपून राहून गुपचूप लोकांना पाहत राहायचं. नाहीतर या पिलरच्या कपारीत कोंडून घ्यायचं स्वतःला. 
खाली मानसं गोंधळ घालत असतात, भांडत असतात-कुरवाळत-कुस्करत असतात. कधी स्वार्थ जपून एकमेकांना मदत तर बऱ्याचदा एकमेकांवर जळत असतात. 
दुसऱ्यावर पाय देऊन, पाय ओढून-तोडून पुढे जायची धडपड करताना दिसतात सगळे. स्वतः चिखलात माखलेले असताना दुसऱ्यावरचे डाग मोजत असतात.
दुसऱ्यावर वार करायचा एकही मौका सोडत नाहीत. केविलवाणे, किडा-मुंगी सारखे लोळत-खुरडत-जगत असताना दिसतात ते मला.. 
दिवसा या खांबावरून मस्त न्याहाळता येतं त्यांना..इथून-वरून.."

"पण मग हि रात्र माझी आहे आणि हे स्थान माझं आहे-अढळ....
 नाही कोणी हिसकावून घेऊ शकणार....
कि हिसकावून घेतलं तरी आता काही वाटणार नाही ?
(ओरडून) घ्या...सगळं घ्या माझं.... कपडे घ्या, पैसे घ्या... शरीर ओरबाडा माझं, मांस घ्या...अब्रू घ्या माझी, माझा मान-माज सगळं-सगळं हिसकावून घ्या.. माझ्या इच्छा-आकांक्षा-स्वप्नं सगळंच ओरबडलत कि.... अजून काय हवंय?.
जे होतं ते सगळं घेतलंत... आता जे माझं नाहीचे ते पण घ्या...
पण..पण तरी नाहीच मिळणार तुम्हाला मी कधी.. 'मी'.. 'मी' जो आहे आता तो.... 
तुमच्यापासून पन्नास फुट उंचावर उभा. तुमच्या पेक्षा कितीतरी पट उंचच राहील मी...
कितीही ओरबाडलं-खेचलं मला तरी नाहीच उतरणार कधी खाली मी. तुमच्या पातळीला येणं नाही कधीच... 
फक्त तुमच्यासारख्या लोकांना किडामुंगीसारखं पाहत राहील... इथून-वरून"

"तसंही काही उरलंय का आता माझ्यात? शरीर? 
नाही दिसत मला काहीच आता...
सूर्योदय पाहताना रंग नाहीच दिसत आता. पिलरखाली लपायला जायची सूचना वाटते फक्त - सूचना नाहीच सक्ती.
सुर्यास्त अनिमिष डोळ्याने पाहायचो हे आठवून पण आता हसू येतं...
हाच सूर्य उद्या येणारे आणि असाच मावळणारे. कितेक कोटी वेळा हा असाच दिसलेला असणार, कितेक कोटी वेळा कितेक कोटी मानसं याच्याकडे बघत सुखावले असणार- हे सत्य जाणवत राहत - बोचत नाही, फक्त जाणवतं...
सूर्याला ते जितकं सवयीचं झालं असेल तितकंच कदाचित मला पण सवयीचं झालंय आता. 
घड्याळाकडे जितक्या कंटाळवाण्या नजरेने बघायचो तितक्याच, कदाचित त्याहून जास्ती कंटाळवाण्या नजरेने बघतो मी सूर्याकडे. 
त्यालापण माझी ही नजर सवयीची झालीये. केविलवाण्या नजरेने चुकवत राहतो तो माझी नजर..
बाकी लोकांच्या नजरेत celeb म्हणून वावरताना माझी अशी तुच्छ, विरक्त नजर खुपत असेल कदाचित त्याला...खुपोत.... 
काही फरक नाही पडत.. त्याला नाहीच. मला तर त्याहूनही नाही.
रंगीबेरंगी कपडे घालून लोकं खाली सर्कशीचे खेळ करत असतात, काही डोंबारी असतात, काही नुसते तारेवरच्या कसरतीला cheer-up करणारे, काही नुसते बघे, तर काही त्या सर्कशीपासून नजर चुकवीत बसून-झोपून असतात.
त्यांच्या कपड्यांचे रंग नाही दिसत. चेहऱ्यावर फासलेल्या रंगखालाचे त्यांचे खरे चेहरे दिसत राहतात नुसते. 
रंगांची वखवख नाही दिसत, सगळे gray दिसत राहतात. काही फिकट gray ,काही डार्क gray
आणि दिसतात ती कपड्याआतून व्यवहार करणारी शरीरं... 
उंचच उंच बिल्डींग मध्ये राहणारे खुजे लोक...वारुळातून भसाभसा बाहेर पडत असतात आणि खुरडत-खुरडत परत वारुळात जाऊन पोखरत राहतात स्वतःचीच घरं..."

"ऐकू येतं ? नाहीच. 
खालचा कोलाहल पण सवयीचा झालाय. कान बंद केले तरी आतला कल्लोळच ऐकू यायचा, त्यापेक्षा परवडतो हा.
पहाटेच चौकातल्या मंदिराचा घंटानाद सुरु झाला कि प्रार्थनेच्या ऐवजी लोकांची देव्हाऱ्यात फेकलेली अपेक्षांची-इच्छा -आकांक्षांची रडगाणी ऐकू येतात.
चौकातल्या कबुतरांच्या फडफडीमध्ये मला उलट त्यांच्या बंदिस्तपणाची तडफडच ऐकू येते. पंख असूनही आकाशच बंदिस्त असण्याची तडफड....
हि लोकं एकमेकांशी बोलतात? किंवा जे ऐकू जातं तेच त्यांना बोलायचं असतं? 
बोलतात त्यापेक्षा हजारपटीने जास्ती सांगायचं असतं त्यांना. पण नाही होत त्यांच्या कडून...
तोंडातून बाहेर पडणारे शब्द नाही ऐकू येत. आतल्या आत कोंडलेले, कधीच बाहेर न पडणारे शब्द घुसत राहतात माझ्या कानात. ती घुसमट ऐकू येते मला. नकोसं होतं  तेव्हा दिवसभर ते ऐकणं...त्यांच्या गाभाऱ्यातला आवाज माझ्या कानात घुमत राहतो दिवसभर.
म्हणून रात्रीची हि वेळ खरी माझी - 
काहीच ऐकू न येण्याही.. किंवा स्वतःचं ऐकायची- स्वतःला ऐकायची. 
तेही खूप आवडतं असं नाहीच...पण बोलावं लागतं स्वतःशी आणि ऐकावं पण लागतं स्वतःचं. 
नाही ऐकलं स्वतःचं- नाही बोललो स्वतःशी तर उडी मारावी लागेल मला खाली या लोकांच्यामध्ये...परत..
त्यांनी माझं ऐकावं यासाठी भिक मागत राहणं, त्यांच्या आवाजात माझा आवाज मिसळू देण्याची धडपड आणि तरीही स्वतःचा आवाज शाबूत राखण्याचा केविलवाणा प्रयत्न... 
त्यापेक्षा नकोच न हे ऐकणं-ऐकवणं इतरांना. स्वतःचीच शांतता ऐकत राहायचं....."

"वास ... कसा असतो गंध?
बधीर झालंय नाक. सतत सर्दी झाल्यासारखं किंवा त्याहूनहि वाईट..... कोरडीठक्क होऊन-होऊन आतली रंध्र सुकून गेलीत.
वास आणि त्याचा आजूबाजूला असणाऱ्या आठवणीपण  तशाच सुकून गेल्यात....
कानाच्या पाळीजवळचा शिकेकाईचा मंद वास, उदबत्तीचा जळकट-उग्र वास, बाळाचा दुधाळ वास, फिनैलचा/मुतारीचा नाकातले केस जाळून टाकणारा वास, रात्रभर कुस्करलेल्या फुलांचा दुपारी जाणवणारा वास, घरातल्या कोनाड्या-कपारीतला ओळखीचा वास..
गंध-सुगंध-वास-सुवास सगळे विसरून टाकलेत मी.
एकुनेक वासाची एकूण एक रंध्र आणि त्यांना चिकटलेल्या एकूण एक आठवणी-मानसं-स्थळ - सगळी बधीर करून टाकलीयेत मी. 
नाक नाहीचे... नुसता एक मोठा अवयव आहे. तोंडावर वाढलेला-वयोमानानुसार वाढत जाणारा-बिनकामाचा. बाकीच्या बिनकामाच्या शरीरासारखा.  फक्त इतकंच .. "

"जाणवतं काही ? नाहीच ...
पाऊस नाहीच मुरत आता आतवर. भिजभीज भिजलो तरी कोरडाच राहतो, एकाही सरीचा ओला ओरखडा पण नाही उठत कुठेच..
थंडी शहारे नाही आणत कि तोंडातून वाफा हि नाही काढत. हाडं पण कुडकुडत नाहीत- नुसती एकमेकांना पकडून-सावरून कशीबशी उभी असतात...
उन्हाने त्वचा काळी पडून पडून करपून गेलीये कधीच. हाडाला गच्च चिकटून राहिलेली असते नुसती.. खालच्या मांसाची उब्ब किंवा आधार तर कधीच गेलाय. 
सुरकुतलेली-चुणीदार दिसते नुसती. सोसल्याच्या हजार चुण्या जपत-दाखवत... अंगावर सैलसर पांघरलेल्या जुनाट वस्त्रासारखी सारखी...जीर्ण-शीर्ण.. 
कोट्यावधी गोष्टींना स्पर्श करून शिसारी आलीये आता स्पर्शाची पण.. 
गरमशार-गारकच्च-ओले-कोरडे-घामट-उगाच.... हजारो स्पर्श, त्याचे लाखो अर्थ आणि त्यांच्या अगणित आठवणी......
नको वाटतं आता कशालाही स्पर्श करायला. हि पेन्सिल राहते कशीबशी हातात.... अगदी स्वतःच स्पर्श पण नकोसा झालाय..."

"भुकेने वखवखलेली जीभ नुसती वळवळत राहते मोकळ्या बोळक्यात...दातांच्या संद्या-कपारीत सतत काहीतरी शोधत असते...दातांची चव तेव्हडी लक्षात आहे तिच्या आता.."

"पंचेद्रियाचा इतकी वर्ष जपलेला माज ...सगळा कधीच उतरलाय... कदाचित सगळ्या शरीराचाच माज उतरून पण वर्षं झाली..
नसलेल्या बुद्धीचा माज पण उतरला हळूहळू...  अविवेकी लोकांच्यामध्ये राहून जपलेला विवेक पण पायदळी तुडवला गेलाय...त्यांच्या जगात मीच वेळोवेळी वेडा ठरविला गेलोय.
मनातल्या भाव-भावना कधी काळी होत्या कि नव्हत्या अशी शंका यावी इतकं रिक्त झालंय मन.. 
आतपर्यंत काही पोचतच नाही.. निबर झालाय सगळं, कोडग्या कातडीचं...   
नुसता एक भव्य रिकामेपणा उरलाय मनात...या फ्लायओव्हरच्या सांगाड्यापेक्षाही भव्य.."

"पण मग सगळं जाऊनही 'मी' अजून उरलोय इथे.. 
हा 'मी' कोण आहे मग ? शरीर नाही... बुद्धी नाही.. मन नाही....
मग आता जे उरलंय ते काय आहे.. 
जे निरासक्त आहे.. अविकारी, विरक्त आहे...स्वतंत्र आहे..मुक्त आहे...
या क्षुद्रजीवांच्या खूप वरून उडतोय मी आकाशात ... 
खरच फ्लायिंग ओवर ... फ्लायओवर"    

Monday, April 25, 2011

Rapunzel


कठड्यावरून डोकावत वर आलेला सूर्य आरशामधून दिसायचा तिला. मग न्याहाळता नाही यायचं तिला, चमकत राहायचा आरसा. 
आरसा असा चमकला कि म्हातारी यायची वेळ झालेली असायची...  केस सांभाळत Rapunzel उठेपर्यंत खालून आवाज ऐकू यायचा..     
"Rapunzel, Rapunzel, let down your hair, so that I may climb the golden stair"
म्हातारी चढून वर आली कि कितीतरी वेळ बघत रहायची तिच्याकडे... केस उपटून तोडून टाकल्याचं नाटक करून म्हातारी तिची दृष्ट काढायची...
दिवसभर मग कौतुक चाललेलं असायचं, हजार प्रकारे तिच्या इतक्या मोठ्या केसांच्या वेण्या घालत बसे म्हातारी.. दोन म्हातारे हात दिवसभर तिच्या केसांना गोंजारत बसायचे.. आणि हे करत असताना हजार गोष्टी बोळक्या तोंडाने म्हातारी सांगत बसायची. 
"बाहेरचं जग किती  वाईट आहे, पिसासारखी तू इथे कशी सुखात आहेस. किती दुःख आहेत बाहेर, या उंच मनोऱ्यापर्यंत कोणतीच दुःख कशी पोहोचू शकणार नाहीत" असे एक ना हजार किस्से रोज नवीन उत्साहाने सांगत बसायची म्हातारी. 

कधीच न पाहिलेल्या बाहेरच्या जगाचं असं चित्र Rapunzel ने म्हातारीने दिलेल्या रंगाने रंगवले होते. 
कंटाळून मग सूर्य पण कठड्यावरून उडी मारून फरार व्हायचा. संध्याकाळच्या प्रकाशात लालसर चमकणाऱ्या केसांच्या दोरीने म्हातारीपण तिच्या महालात जायची.

दिवसभर केसात अडकून राहिलेल्या सूर्याची किरणे सोडवत बसायची ती. सुटलेली ती किरणं संध्येला अजून रंगीत करत राहायचे. म्हातारीने लाडाने घातलेल्या वेण्या सोडताना म्हातारीने डोक्यात भरवलेल्या गोष्टीपण सोडून देण्यासाठी गात बसायची ती.  
आवडत्या कंदिलात वात लावून दिवा पेटवेपर्यंत खालून अजून एक हवीहवीशी हाक ऐकू यायची.        
"Rapunzel, Rapunzel, let down your hair, so that I may climb the silver stair"
दिवसभर उन्हातानात मेंढ्यामागे भटकणारा गुराखी तरुण खाली हसत तिला हाक मारायचा. हाक इतक्या उंचावरच्या मनोऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत Rapunzel चे केस खाली पोहोचलेले असायचे.   आल्याआल्या त्याच्या घामट मिठीमध्ये विस्कटून जायची ती, केसांसकट. 
आवडत्या कंदिलातली वात काढून ती त्याने आणलेल्या आकाशकंदिलात लावायची. तिच्या एका केसाला आकाशकंदील बांधून हवेत उडवायचा तो. कितीतरी वेळ आकाशात उडणाऱ्या त्या दिव्याकडे बघत ते सगळे ग्रह, तारे फिरून यायचे. 
तो तिला बाहेरच्या जगाची सुंदर-सुंदर चित्र काढून दाखवायचा. म्हातारीने दिवसा सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तो रात्री पुसून टाकायचा.
कंदिलातली एकुलती एक वात प्रकाश सांडत आकाशात फिरत असायची आणि खाली हे दोघं अंधारात आकार-उकार-हुंकारांची चित्र रेखाटत बसायची.    

कधीच न पाहिलेल्या बाहेरच्या जगाचं असं चित्र Rapunzel ने तिच्या गुराखी-राजकुमाराने दिलेल्या रंगाने रंगवले होते. 
रात्रीबरोबर रात्रभर फिरून-थकून, डोळे किलकिले करत आकाशकंदील पण जमिनीवर उतरायचा. Rapunzel चे डोळे उघडायच्या आधीच चंदेरी चमकणाऱ्या केसांच्या दोरीने तो गुराखी त्याच्या माळावर परत जायचा. 

म्हातारीच्या गोष्टी डोक्यात जास्ती वेळ राहायच्याच नाहीत. त्या तरुणाच्या गोष्टी मात्र डोक्यात सतत फिरत राहायच्या, काहीतर पोटापर्यंत जाऊन बीज होऊन रुजल्या होत्या.
त्यारात्री चंद्राच्या प्रकाशात तिने हे त्याला सांगितलं, ती सांगत असताना तो मात्र आकाशकंदील आखडून घेत आहे याची जाणीवही नाही झाली तिला. 
त्यारात्री लवकरच आकाशकंदील खाली आला. 
अजून पेरभर वात शिल्लक होती. 
कंदिलाच्या त्या मिणमिणत्या प्रकाशातही चमकणाऱ्या केसांच्या दोरीने तो खाली उतरला. माळावर नाही गेला तो. कुठे गेला कोणालाच नाही कळलं. 

कोणी रंगवून सांगितलेलं जग खरं? दिवसा म्हातारीने सांगितल्यासारखं  कि रात्री त्याने दाखवल्यासारखं ?
कि दोन्ही जग खोटीच? आपण नाहीच पहिलीत ती. कसा विश्वास ठेऊ त्यांच्यावर? 
दोघांनी केवळ त्या जगाची स्वप्न दाखवली. कोणीही नेऊन का नाही आणलं मला त्या जगात?
कि दोघांनी मी हवी होते? केवळ मी? या बंद मनोऱ्यातली 'बंधिस्त Rapunzel'?
 
"Rapunzel, Rapunzel, let down your hair, so that I may climb down the stony stair"  
स्वतःलाच हाक मारली तिने.. आणि स्वतःच ओ पण दिला.
स्वतःला शेवटचं न्याहाळून आरसा फोडून टाकला तिने. आरश्याच्या काचेने केस कापून टाकले स्वतःचे. 
कठड्याला एक टोक बांधून उतरली ती तिच्या मनोऱ्यावरून. 
उतरल्या उतरल्या दुसऱ्याच पावलाला ठेचकाळली ती. आवडत्या कंदिलाला थोडा तडा गेला.

म्हातारीचे आणि गुराखी-तरुणाचे रंग घेऊन ती त्यांने रंगवलेल्या जगात एकटीच निघाली. दोघांनी रंगवलेल्या चित्रांशी खरं जग कुठेच जुळत नव्हतं. दोन्ही चित्र खोटीच निघाली.
काट्याकुट्यातून, दऱ्या-खोऱ्यातून, नदीनाले पार करत ती खरं जग आता पाहत होती. 
घासातला घास देणारे हात आणि बरबटलेल्या नजरा झेलत होती ती.
दोघांचे सगळे रंग एकत्र होऊन नवीनच काहीतरी रंग तयार व्हावा तसं जग होतं हे. 
कितेक दिवस सगळं सहन करत, सोसत राहिली ती. खूप त्रास भोगला तिने, खूप चांगली मानसं पण पहिली.
पण जसजसे पोट दिसायला लागले होते तसं तसं शरीरपण थकत चाललं होतं. 
शेवटी तिने ठरवलं.
         
"Rapunzel, Rapunzel, let down your hair, so that I may climb the final stair"  
इतके दिवस ते दोघं याच वाटेने माझ्यासाठी स्वप्न घेऊन वर येत होते. आता याच केसांच्या दोरीने सत्य घेऊन वर चढायचं आपल्या मनोऱ्यात परत. शेवटचं.. मग बंधिस्त..
रुक्ष-राठ झालेल्या, काचणाऱ्या केसांच्या त्या दोरीने ती भर उनात कशीबशी वर चढून गेली. 
कठड्यावरून अक्षरशः अंग टाकून दिलं तिने आत. ग्लानी आली होती तरी उठून तिने कठड्याला बांधलेली केसांची गाठ आधी सोडली...
आता कोणी खालून कोणी हाक मारायला नको, कोणी वर यायला नको आणि कोणी खालीही जायला नको. 
ते जग सुटलं, त्या जगाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आणणारे हे लांबसडक केसहि नकोत.
Rapunzel आता या केसांशिवाय जगेल. 
जगाशी काहीच संबंध न ठेवता जगेल.

शेवटचे २ महिने खूप वाईट गेले तिचे, सतत उलट्या व्हायच्या तिला. 'अति उलट्या म्हणजे बाळाला जावळ खूप' असं ऐकलेलं तिने.

त्या रात्री कितीतरी आकाशकंदील आकाशात तरंगत होते. इकडून तिकडे आकाशात आतिषबाजी चालू होती. उल्कावर्षावाने सगळी रात्री पेटून उठली होती. 
आजवर पाहिलेल्या रात्रीच्या आकाशापेक्षा हि रात्र खूप जास्ती प्रकाशमान होती. Rapunzel च्या स्वप्नात नेहमी येणारे 'उडणारे आकाशकंदील' ते हेच होते.
प्रसवकळा विसरायला लावणारी रात्र होती ती. रात्रभर जागीच होती ती. सकाळ होत आली तरी ते दिवे जमिनीवर येईनात. 
सूर्यपण डोंगराडून रात्रीची हि आतिषबाजी बघत रेंगाळला होता. त्याची काही अति-शिस्तीशीर किरणं वेळ पाळून घुसली होती आकाशात. 
रात्रीचे म्हातारे रंग आणि पहाटेचे तरुण रंग एकमेकांत मिसळले होते. ती रात्र पण नव्हती आणि दिवस पण नाही. 
दोघांचेही रंग नव्हते ते. 
सगळ्या रंगांचं अजब सुंदर चित्र आकाशाच्यापटावर रंगलेलं होतं..

त्या दोघी रात्र आणि पहाटेचं हे सुंदर चित्र अनिमिष डोळ्यांनी पाहत होत्या.

Rapunzel च्या 
चेहऱ्यावर
 प्रसववेदनेची आभा होती. कुशीतल्या बाळाला उबेत घेत होती ती.
आणि कुशीतल्या लहानग्या जीवाचे किरमिजी-टपोरे डोळे आकाशातले ते रंग टिपत होते. 
सोनेरी-चंदेरी-निळ्या-लाल-भगव्या प्रकाशात बाळाचे लांबसडक केस चमकत होते... 

तेच लांबसडक केस....जगाशी जोडणारे....परत    
"Rapunzel, Rapunzel, let down your hair, so that I may climb the colorful stair"