Pages

Tuesday, February 25, 2014

लाईटचा खांब

चायला.. कधी कशाची आठवण येईल सांगता येत नाही. 'कशाची' म्हणालो मी, 'कोणाची' असं नाही.

नगरच्या जुन्या घरात दीड पायऱ्या उतरून आत गेलं कि डाव्या हाताचा कोनाडा माझी खेळायची जागा होती. कितीतरी लहान-सहान-किडूक-मिडूक गोष्टी होत्या माझ्या खेळात. डावीकडच्या पायरीवर वरती शत्रूंच्या सेना मांडायच्या आणि समोर- खाली आपला किल्ला. जिथे किल्ला असायचा त्याच्या खालची फरशी जरा इतरांपेक्षा वेगळी होती, खडबडीत आणि भुऱ्या रंगाची. घर खूपच जुनं असल्यामुळे त्या फरशी खालची जमीन बहुतेक (घुशींनी पोखरून) भुसभुशीत झाली असणार....
तर परवा, त्या फरशीवर काही आपटलं कि पोकळ आवाज यायचा, त्या आवाजाची आठवण आलेली...

बरीच वर्ष बाहेरून प्लास्टर नव्हतं बंगल्याला त्यामुळे खिडकीतून बऱ्याचदा पावसाचं पाणी आत यायचं. लोखंडी फ्रेम आणि लाकडी खिडक्या खरतर वाईट पण त्यातल्या त्यात स्वस्त combination होतं. लोखंडी फ्रेम पिच्कायची आणि लाकडी खिडक्या फुगायच्या. त्यामुळे खिडक्यांच्या खिट्ट्या कधी नीट लागायच्या नाहीत. खूप खटपट करून त्या लावाव्या लागायच्या. नाहीतर नाड्यांनी त्या खिडक्या घट्ट बांधायचो आम्ही.
तर परवा, त्या खिडक्यांच्या खिट्ट्या लावताना करावी लागणारी कसरत आठवली.

बाजूच्या जुन्या भिंतीवरून चालणे आमच्यासाठी मोठा पराक्रम असायचा. त्या भिंतीवर जागोजागी पक्ष्यांना दाणा-पाणी द्यायला म्हणून काही छोटे खड्डे केलेले होते मग ते चुकवत जावं लागायचं.
परवा त्या लहान खड्ड्यांचा बोटी सारखा आकार आठवला... उगाच...

मध्ये एकदा सातारच्या बागेच्या कुंपणाला लावलेला वायरीचा कडी-कोयंडा आठवला होता.

आणि आजतर आमच्या वाड्याच्या बोळी समोरचा लाईटचा खांबच आठवला..
अगदी छोटी ८-१० फूट रुंद बोळ होती आमची आणि बोळ जिथे रस्त्याला मिळते तिथे हा खांब होता.
या खांबाला जमिनीपासून एक-दीड फूट उंच असा सिमेंटचा बेस होता आणि खांबाला लागून ३-४ फूट उंच शेजारच्या दुकानाचा कट्टा.
आत्या-आजी मला घेऊन यायची कडेवर. अगदीच हडकुळी होती आजी, मी झेपायचो नाही तिला म्हणून मग ती खांबाला टेकून मला रस्ता-गाड्या-गाई दाखवत रहायची.
मग नंतर लहान असताना कट्ट्यावर चढायचे म्हणजे आधी या सिमेंटच्या बेस वर चढायचा आणि मग गुडघे टेकवून कट्टा सर करायचा. आधी अवघड जायचं ते पण मग नंतर तो खेळ बनलेला. इकडून चढून दुसरीकडून पायऱ्यांनी उतरायचं. Jungle Gym होती ती आमची.
'लोखंड-पाण्याच्या' खेळात हा खांब म्हणजे शेवटचा stop होता. आईच्या शाळेतून लोहचुंबक आणलेलं ते घेऊन लोखंड-पाणी खेळायचो, उगाच भाव पण खाता यायचा आणि शिवाय "हे लोखंड नाहीये- हे अलुमिनियाम आहे, ते स्टील आहे" अशी भांडणं पण नाही व्हायची. [between 'लोखंड-पाणी' मध्ये स्टील चालते]      
जरा मोठे झाल्यावर त्या कट्ट्यावर खांबाला टेकून उभे राहता यायचे. मग या खांबाला टेकून रोज संध्याकाळी आई शाळेतून यायची वाट बघत बसायचो.
वयात येत असताना, संध्याकाळी चितळे रोड वरून जाणाऱ्या मुली याच खांबाला टेकून मनसोक्त पाहायचो.
बोळी मध्ये क्रिकेट खेळताना या खांबाची लाईन म्हणजे फोर होती. Six म्हणजे Out कारण मग ball रस्त्यावर जायचा ना.
आतून पोकळ होता तो त्यामुळे खांबाला दगड मारला किंवा ball लागला कि मस्त आवाज पण यायचा. घंटा वाजल्या सारखा.
दहीहंडी मध्ये एक टोक खांबाला तर दुसरे समोरच्या भिंतीवरच्या खिळ्याला असायचे.
रस्त्याच्या समोरच्या बाजूला खूप श्रीमंत लोकांचा वाडा होता. दिवाळीच्या रात्री आमचे लहान-लहान फटाके संपले कि त्यांची आतिषबाजी सुरु व्हायची.-४ तास मग या खांबाला टेकून त्यांची दिवाळी बघत बसायचो. दहा हजाराची लड लागली कि खांबाला घट्ट धरून ठेवायचो, नवीन-नवीन शोभेचे फटाके पापणी न मिटता - गाल खांबाला चिकटवून बघत राहायचो. थंडीमध्ये खांबाला गाल लागले कि मस्त गार वाटायचं. एकदम गुळगुळीत झाला होता तो खांब, नवीन कपड्यांना मग त्या खांबाचे शिक्के लागून राहायचे...
नेहमी एखादा तरी पतंग या खांबावर फडफडत असायचा...
कित्येक वर्ष झाली असतील तिकडे जाऊन- तो खांब पाहून- त्याला टेकून. आज अचानक आठवला तो. भरून आले खूप.

एकवेळ माणसे आठवणं साहजिक आहे पण अशा काहीच्या-काही गोष्टी कशा काय आठवतात कळत नाही.
कुठल्यातरी काळच्या, कुठेतरी दिसलेल्या, कधीतरी हाताळलेल्या शेकडो गोष्टी डोक्यात असतात आपल्या. का आठवतात या गोष्टी? कुठे नोंद असते यांची? कशाशी नातं अस्त यांचं? का कधीपण डोके वर काढतात या मधूनच?
काही काही कळत नाही..

फक्त या गोष्टींचे स्पर्श, आवाज, चवी अजूनही जाणवतात राहतात.